शाळेमध्ये मुलीनी प्रतिवर्षाप्रमाणे हादगा बसवुन दररोज हादग्याची गाणी म्हटली. यामध्ये इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुली सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्राच्या पारंपारिक सणा मधला एक सण मुलींचा प्रिय असा हादगा..पण पुढे पुढे आमच्या कड़े त्याचा अपभ्रंश होउन हातका झाला. यालाच काही ठिकाणी भोंडला असेही बोलतात.
वर्षाऋतु तले एक नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र.ज्यादिवशी सूर्य हस्त नक्षत्रा मध्ये प्रवेश करतो त्या दिवसा पासुन पुढे १६ दिवस हातका चालू होई.
हस्त नक्षत्रा मध्ये पाऊस वळवा सारखा येतो.विजा होतात . ढग घडघडतात.
सुरवात गणेशाच्या पुजनाने. आपला खेळ यशस्वी होण्यासाठी ही एक प्रार्थना .
एलमा पैलमा गणेश देवा ,
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा.
मांडला ग मांडला वेशिच्या दारी.
पारवाळ घूमतय बुरुजावरी.
पारवाळ पाखरांचे गुंजगुंज डोळे.
गुंजगुंज डोळ्यांच्या घडवीला टिक्का.
आमच्या गावच्या भूलोजी नायका.
येशिल काय ..जाशील काय....
कांदा चिर बाई ,तांदुळ काढ.
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दुरगुंड्या .
दूरगुंड्या ची वाजली टाळी .
आयुष्य दे रे वनमाळी.
माळी गेला शेता भाता .
पाऊस पडला येता जाता.
पड पड पावसा थेंबाथेंबी .
थेंबाथेंबी अळ्या लोंबी .
अळ्या या लोंबती अंगणा .
अंगणात होती सात कणस .
हादग्या तुझी सोळा जिन्नस.
============
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता पेरु
आमचा हातका सुरु.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता संत्री
आमचा हातका मंत्री.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता पेरु
आमचा हातका नेहरु.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती लगोरी
आमचा हातका पुढारी
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता ताम्हण
आमचा हातका बामण
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता खराटा
आमचा हातका मराठा.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता कोहळा
आमचा हातका मावळा.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती वाटी
आमचा हातका घाटी .
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती फुकणी
आमचा हातका कोकणी
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता परात
आमचा हातका दारात
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता उंदीर
आमचा हातका सुन्दर.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती मासोळी
आमचा हातका सकाळी
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती सुपारी
आमचा हातका दुपारी.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती चाफेकळी
आमचा हातका संध्याकाळी
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होती कात्री
आमचा हातका रात्री.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता दोडका
आमचा हातका लाडका.
आड बाई आडवनी
आडाच पाणि काढोनी
आडात होती दिवळी
दिवळीत होता बाजा
आमचा हातका राजा.
=======================
सोळा ठीपक्यांचा बांधला वाडा
तो बाई वाडा कुणाच्या दारी
तो बाई वाडा सुमनच्या दारी
(जिच्या दारात हातका तिच नाव,सर्व मैत्रिणीची नावे )
सुमन सुमन पती कुठ गेले
येथेच होते पण फिरायला गेले.
------------------------------=======
हातका मतका ,तोरण तक्ता
तोरणीच्या शेंड्यावरी
बाळ गोपाळ मांडीवरी
एक एक गोंडा विसा विसाचा
सागर साड्या नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्या नो
सात घरच्या पाहूण्यांनो.
आणा ग आणा बाई करंडफुल
ते बाई फुल मी आणिल
हाद्ग्या देवा वाहिल.
========================
अक्कण माती चिक्कण माती
खळगा तो खणावा.
अस्सा खळगा सुरेख बाई
जातं ते रोवावं.
अस्सं जातं सुरेख बाई
रवापिठी दळावी.
अश्शी रवापिठी सुरेख बाई
करंज्या कराव्या.
अश्शा करंज्या सुरेख बाई
तबकी ठेवाव्या.
अस्सं तबक सुरेख बाई
शेल्याने झाकावं.
अस्सा शेला सुरेख बाई
पालखी ठेवावा.
अश्शा पालखी सुरेख बाई
माहेरी धाडावी.
अस्सं माहेर सुरेख बाई
खेळाया मिळतं.
अस्स सासर द्वाड बाई
कोंडूनी मारीत.
===============================
श्री कांता कमला कांता
अस्स कस्स झाल.
वेडीयाच फुल माझ्या
कंपाळी आल.
वेडीयाच्या बायको ने
केल्या होत्या शेवया.
तिकडून आला वेडा
त्याने निरखून पाहिल.
अळी अळी म्हणूण त्याने
पाण्यात सोडले.
श्री कांता कमला कांता
अस्स कस्स झाल.
वेडीयाच फुल माझ्या
कंपाळी आल.
वेडीयाच्या बायको ने
केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा
त्याने निरखून पाहिल.
होडी होडी म्हणूण त्याने
पाण्यात सोडले.
श्री कांता कमला कांता
अस्स कस्स झाल.
वेडीयाच फुल माझ्या
कंपाळी आल.
वेडीयाच्या बायको ने
केले होते लाडु.
तिकडून आला वेडा
त्याने निरखून पाहिल.
चेंडू चेंडु म्हणूण त्याने
खेळाया घेतले.
श्री कांता कमला कांता
अस्स कस्स झाल.
वेडीयाच फुल माझ्या
कंपाळी आल.
वेडीयाच्या बायको ने
केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा
त्याने निरखून पाहिल.
चक्र चक्र म्हणूण त्याने
हवेत सोडले.
श्री कांता कमला कांता
अस्स कस्स झाल.
वेडीयाच फुल माझ्या
कंपाळी आल.
वेडीयाच्या बायको ने
केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा
त्याने निरखून पाहिल.
गंध गंध म्हणूण त्याने
अंगाला फासले .
श्री कांता कमला कांता
अस्स कस्स झाल.
वेडीयाच फुल माझ्या
कंपाळी आल.
वेडीयाची बायको
झोपली होती
तिकडून आला वेडा
त्याने निरखून पाहिल.
मेली मेली म्हणूण त्याने
जाळुन टाकले.
================
कृष्ण घालितो लोळन
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला चंद्र दे आणुन
त्याचा चेंडू दे करुन
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
कृष्ण घालितो लोळण
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला साप दे धरुन
त्याचा चाबूक दे करुन
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
कृष्ण घालितो लोळण
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला ढग दे आणुन
त्याची गादी दे करुन
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
कृष्ण घालितो लोळण
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला आकाश दे आणुन
त्याच पांघरुन दे करुन
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
कृष्ण घालितो लोळण
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला विन्चू दे धरुन
त्याची अंगठी दे करुन
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
कृष्ण घालितो लोळण
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला चांदन्या दे आणुन
त्याचा लाह्या दे काढून
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
कृष्ण घालितो लोळण
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला सूर्य दे आणुन
त्याचा दिवा दे करुन
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
कृष्ण घालितो लोळण
यशोदा आलिया धावून
काय पाहिजे सांग बाळा
देते मी आणुन
आई मला वाघ दे धरुन
त्याचा घोडा दे करुन
असल रे कसल मागण तुझ
जगाच्या वेगळ.
===============
आज कोण वार बाई
आज कोण वार.
आज वार रविवार
सूर्य देवाला नमस्कार.
आज कोण वार बाई
आज कोण वार.
आज वार सोमवार
महादेवाला नमस्कार.
आज कोण वार बाई
आज कोण वार.
आज वार मंगळवार
लक्ष्मीदेवीला नमस्कार.
आज कोण वार बाई
आज कोण वार.
आज वार बुधवार
विष्णूदेवाला नमस्कार.
आज कोण वार बाई
आज कोण वार.
आज वार गुरुवार
दत्तगुरुला नमस्कार.
आज कोण वार बाई
आज कोण वार.
आज वार शुक्रवार
अंबाबाईला नमस्कार.
आज कोण वार बाई
आज कोण वार.
आज वार शनिवार
मारुतीला नमस्कार.
===================
कारल्याच बी पेर ग सुनबाई ,
मग जा आपल्या माहेरा.
कारल्याच बी पेरल ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा .
कारल्याचा वेल येउदे ग सुनबाई,
मग जा आपल्या माहेरा.
कारल्याचा वेल आला ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा .
कारल्याला पाणि घाल ग सुनबाई ,
मग जा आपल्या माहेरा.
कारल्याला पाणी घातले ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा.
कारल्याला फुल येउदे ग सुनबाई ,
मग जा आपल्या माहेरा.
कारल्याला फुल आल की ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा .
कारल्याला कारल लागू दे ग सुनबाई,
मग जा आपल्या माहेरा.
कारल्याला कारल लागले ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा.
कारल्याची भाजी कर ग सुनबाई ,
मग जा आपल्या माहेरा.
कारल्याची भाजी केली ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा.
कारल्याची भाजी वाढ ग सुनबाई,
मग जा आपल्या माहेरा.
कारल्याची भाजी वाढली ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा.
उष्टखरकट काढ ग सुनबाई ,
मग जा आपल्या माहेरा.
उष्टखरकट काढले ओ सासूबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरा.
आण फणी ,घाल वेणी,
जाग सुनबाई माहेरा .
आणली फणी, घातली वेणी,
जाते ओ सासूबाई माहेरा .
====================
==================
बाजारातून आणला एकच आंबा
त्याच केल चविष्ट लोणच
ते मी लोणच मामंजीना वाढल
मामंजिंनी मला शाबासकी दीली
ती मी शाबासकी तांब्यात भरली.
तो मी तांब्या गंगेत सोडला
गंगेनी मला पाणि दिल
ते मी पाणी झाडांना घातल
झाडानी मला फळेफुले दिली
ती मी फळेफुले हाद्ग्याला वाहिली.
हादगाच्या शेवटच्या दिवशी किंवा हाद्ग्या चा खेळ संपत आला की ही गाणी गायची
====================
शिवाजी आमुचा राणा
त्यांचा तो किल्ला तोरणा
किल्ल्या मध्ये सात तळे
सात तळ्या मध्ये सात कमळे
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायांना तलवार दिली
तलवार घेउनी आले
हिंदू चे राजे ते झाले
हिंदू नी त्याचे स्मरण ठेवावे
हादग्या मध्ये गाने गावे
खिरापत खाऊनी घरी जावे.
==============
**************************************************
जीवनाचे सार या भोंडल्या किंवा हादग्या मधे सांगितले आहे
हस्त नक्षत्र परतीचा कधीही कुठेही न सांगता येणारा जोरदार पाऊस हत्ती सारखा ज्याला समोर ठेवून मुलींचे महिलांचे गाणे हसत खेळत म्हंटले जाते यामागे खूप
खूप मोठ्ठे अनुभव जगण्यास छानसे संदेश दिलेले आहेत म्हणुनच भोंडला हादगा हे मुलींनी
महिलांनी खेळत संस्कृति वाढवत ठेवली पाहिजे